प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- शहरात सध्या युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मद्य, तंबाखू, गुटखा, गांजा, मेफेड्रान(एम. डी) यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचे आयुष्य अंधारात ढकलले जात आहे. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. या गंभीर स्थितीच्या मुळाशी नेमके कोण आहे, हा प्रश्न आता समाजासमोर उभा ठाकला आहे.
नेते जबाबदार की समाज?प्रत्येक निवडणुकीच्या काळात काही नेत्यांकडून मतांसाठी नशेच्या वस्तूंचे वितरण केले जाते, हे उघड गुपित राहिलेले नाही. त्यातूनच अनेक युवक पहिल्यांदा व्यसनाच्या विळख्यात अडकतात. हीच तरुण पिढी पुढे कायमस्वरूपी व्यसनाधीन बनते आणि त्यांचे जीवन मार्गभ्रष्ट होते.
ज्यांच्याकडून समाजाला दिशा मिळायला हवी, तेच नेते जर अशा कृत्यांना प्रोत्साहन देत असतील, तर समाजाचे भवितव्य काय? नागरिकांचीही जबाबदारी नाकारता येणार नाही नेत्यांच्या चुकीच्या वागणुकीला विरोध न करता, आपणच त्यांना पुन्हा निवडून देतो. व्यसनाचे सामाजिक परिणाम दिसूनही मौन बाळगतो.
त्यामुळे ही जबाबदारी केवळ नेत्यांवर न ठेवता, आपल्यालाही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
स्थानिक नेतृत्व कुठे आहे?
हिंगणघाट शहरातील अनेक प्रभागांमध्ये स्थानिक नगरसेवक किंवा नेते या विषयावर बोलायला तयार नाहीत. व्यसनाधीनतेमुळे युवकांचे होणारे नुकसान, कुटुंबांतील तणाव, गुन्हेगारी वाढ याकडे दुर्लक्ष केले जात आहे. समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर भाष्य न करणारे नेतृत्व म्हणजे निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण नाही का?
समाधानाचा मार्ग – सजग नागरिक, जबाबदार नेते
निवडणुकीत प्रलोभन देणाऱ्या उमेदवारांना स्पष्टपणे नकार देणे आवश्यक आहे.
Crimenews /समाजाने आणि पालकांनी युवकांमध्ये व्यसनमुक्त जीवनाची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे.स्थानिक पातळीवर व्यसनमुक्ती केंद्रे, जनजागृती मोहीम, आणि तरुणांसाठी मार्गदर्शन शिबिरे यांची नितांत गरज आहे.