वर्धा जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांसाठी तब्बल ३१० इच्छुकांचे अर्ज दाखल
प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा :-आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि जनतेच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने तब्बल ३१० इच्छुकांनी अधिकृतपणे आपले अर्ज पक्षाकडे दाखल केले आहेत.
वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी, कारंजा, पुलगाव, सेलू, सिंदी रेल्वे आणि समुद्रपूर या नगर परिषदांमध्ये इच्छुकांची चुरस वाढली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांनी राजकारणात पदार्पणाची तयारी दाखवली असून, अनुभवी माजी नगरसेवक आणि समाजसेवकांनीही पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया उत्साहवर्धक आणि स्पर्धात्मक ठरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले.
प्राप्त अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार असून, स्वच्छ प्रतिमा, जनतेसाठी काम करण्याची वृत्ती आणि विकासाभिमुख विचारसरणी या निकषांवर उमेदवार निश्चित केले जातील. उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय स्थानिक नेतृत्व आणि जिल्हा पातळीवरील समन्वय समितीच्या बैठकीनंतर घेण्यात येईल.
अतुल वांदिले म्हणाले, “जनतेच्या विकासाचा विचार, स्वच्छ प्रशासन आणि प्रामाणिक सेवा या तत्वांवर आमचा पक्ष ठाम आहे. कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि जनतेचा उत्तम प्रतिसाद पाहता, आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्थिती वर्धा जिल्ह्यात अधिक मजबूत होईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, पक्षाचे कार्यकर्ते गेल्या काही वर्षांपासून जनतेशी थेट संपर्कात राहून काम करत आहेत.
Sharadpawar/स्थानिक विकास, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर पक्ष जनतेचा विश्वास संपादन करत आहे. सध्या सर्व नगर परिषदांमध्ये निवडणुकीचा माहोल रंगू लागला असून, उमेदवारांची घोषणा होताच प्रचार मोहीमेला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.






