Sarpanchnews /माजी सरपंच धीरज लेंडे यांच्या पुढाकाराने परसबागेला मिळाले चैतन्य

0
48

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात नव्या रोपांची लागवड; मिशन समृद्धीच्या प्रेरणेतून उपक्रम

पळसगाव बाई │ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत नवनवीन उपक्रम राबविणारे माजी सरपंच श्री. धीरज लेंडे यांच्या पुढाकाराने पळसगाव बाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्र यांच्या परिसरातील परसबाग प्रकल्पाला नवे चैतन्य लाभले आहे.hingnghatnews

मिशन समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही परसबाग गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या पोषण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

या उपक्रमांतर्गत शाळा परिसरातील परसबागेत स्वच्छतेपासून नव्या रोपांच्या लागवडीपर्यंत विविध कामे करण्यात आली. परिसरातील झाडांभोवतीची तणनिवारण करून जमीन तयार करण्यात आली व त्यानंतर फळझाडे, औषधी वनस्पती तसेच विविध पालेभाज्यांची लागवड करण्यात आली.wardhanews

मुलांच्या आहारात रोजच्या रोज पौष्टिक अन्नघटकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पालक तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने हे विशेष नियोजन करण्यात आले. पालेभाज्यांच्या लागवडीमुळे विद्यार्थ्यांना ताज्या, रसायनमुक्त भाज्या उपलब्ध होणार असून त्यांच्या पोषण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.

याप्रसंगी मिशन समृद्धी PRP सौ. वैशाली किशोर गोल्हर यांनी परसबाग उपक्रमाचे महत्व सांगत शाळा आणि अंगणवाडीतील मुलांसाठी पोषक अन्नसाखळी मजबूत करण्यावर भर दिला. त्यांनी मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सॉईल सन फार्मर प्रोडूसर कंपनीच्या संचालिका सौ. प्रीती लेंडे यांनी मार्गदर्शन करताना कृषीआधारित प्रायोगिक शिक्षण व शाश्वत पद्धतीने पिके कशी घेतली जावीत याबाबत माहिती दिली. परसबाग ही फक्त बाग नाही तर मुलांसाठी नैसर्गिक प्रयोगशाळा आहे, जिथे ते कृषीविज्ञान, पर्यावरण आणि पोषण यांचे प्रत्यक्ष शिक्षण घेतात, असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमात प्रशासक श्री लवणे सर, ग्रामसेवक धीरज शिरपाते, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. प्रशांत बुरले, मनरेगा कर्मचारी रुपेश मून, महेंद्र भट, योगेश देवतळे यांचे विशेष सहकार्य लाभले. गावातील युवक आणि महिलांनी देखील उत्साहाने भाग घेत परसबागेची साफसफाई, कुंपण दुरुस्ती आणि रोपांची लागवड यामध्ये मदत केली. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरला.

माजी सरपंच धीरज लेंडे यांनी या प्रसंगी सांगितले की, “शाळा व अंगणवाडीतील मुलांना पोषक अन्न, स्वच्छ वातावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे ज्ञान देणे ही आजच्या काळाची गरज आहे. परसबाग हा त्यासाठी एक आदर्श उपक्रम ठरेल. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करण्यात येईल आणि अधिक फळझाडे व पोषक मूल्य असलेली पिके लावली जातील.”

Sarpanchnews /पळसगाव बाई ग्रामपंचायतीच्या सामाजिक जबाबदारीतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या परसबाग प्रकल्पामुळे शाळा परिसराचे सौंदर्य वाढले असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि पोषणाबाबत जागरूकताही निर्माण झाली आहे. गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम केल्यास असे उत्तम उपक्रम फुलत राहतील, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here