हिंगणघाट सचिन वाघे
समुद्रपूर :-हिंगणघाट, समुद्रपूर व सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील खुर्सापार जंगल परिसरात वावरत असलेला आणखी एक वाघ आज यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात वन विभाग व प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या सततच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे व प्रशासनाच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी ठरली. जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाघाच्या नैसर्गिक अधिवासाचाही विचार करून ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.
या गंभीर विषयाबाबत हिंगणघाट–समुद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे माननीय वनमंत्री गणेशजी नाईक यांच्यासोबत यासंदर्भात सविस्तर बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत परिसरातील पाचही वाघांना जेरबंद करण्याचे ठोस निर्देश वन विभागाला देण्यात आले होते. राज्यात प्रथमच अशा प्रकारचे स्पष्ट आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी एका वाघाला जेरबंद करण्यात आले होते, तर आज आणखी एका वाघाला पकडण्यात यश आले आहे. उर्वरित वाघांबाबतही हिंगणघाट, समुद्रपूर व सिंधी रेल्वे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Hingnghatnews /वन विभाग, प्रशासन व स्थानिक यंत्रणांच्या समन्वयामुळे ही महत्त्वपूर्ण कारवाई शक्य झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.








