हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक केंद्राची मागणी; पालकांसाठी सुविधांचा अभाव
प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा :आष्टी येथील न्यू मॉन्टफोर्ट औषध निर्माणशास्त्र संस्था येथे बुधवारी आयोजित CET (सामाईक प्रवेश परीक्षा) दरम्यान मोठा गोंधळ उडाला. बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी व पालक सकाळी ७ वाजल्यापासून परीक्षाकेंद्रावर पोहोचले होते. मात्र, केंद्रावर विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त वातावरण निर्माण झाले. Wardhanews
उपस्थित कर्मचाऱ्यांनी “CET विभागाकडून पैसे मिळाले नसल्यामुळे प्रवेश देता येणार नाही,” अशी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला. त्यामुळे काही वेळातच परीक्षाकेंद्राबाहेर मोठी गर्दी झाली. वर्षभर CET परीक्षेची तयारी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला असून काही विद्यार्थी रडू लागल्याचेही पाहायला मिळाले. पालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून 112 क्रमांकावर कॉल करण्यात आला. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागाशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी खासदार अमर काळे यांचे पीए जितेंद्र शेट्टे देखील घटनास्थळी उपस्थित होते. Cet/
काही वेळाच्या चर्चेनंतर प्रश्न मार्गी लागला व विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश देण्यात आला. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती व मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Hingnghatnews /दरम्यान, हिंगणघाट तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हिंगणघाट येथे स्वतंत्र CET परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या पालकांसाठी कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानेही संताप व्यक्त करण्यात आला.
संतप्त पालकांनी संबंधित परीक्षा केंद्राची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.



