प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा :माननीय पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाईचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवून मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले.
दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, वैष्णवी नगर येनोरा माता मंदिर रोड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचण्यात आला. त्यावेळी एक सिल्व्हर रंगाची महिंद्रा एक्स.यु.व्ही. 500 (क्र. एम.एच. 43 ए.एल. 9294) वाहन पकडण्यात आले.
तपासात आरोपी (1) अक्षय विनोद डेहणे, (2) सुजीत अशोकराव गावंडे, आणि (3) मोहन हरिभाऊ टिचकुले, हे तिघेही हिंगणघाट येथील रहिवासी असून, ते संगणमताने मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळले. पुढील तपासात हा माल आरोपी (4) निखील रामनवार व (5) स्वप्नील शर्मा (दोघेही हिंगणघाट) यांच्याकडून खरेदी केल्याचे उघड झाले.
कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण 08.53 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, कार व मोबाईलसह रु. 10,42,120/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
/Crimenews/ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी व पथकातील कर्मचारी मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, अक्षय राऊत, अभिषेक नाईक, विनोद कापसे व अखिल इंगळे यांनी केली.