प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा : शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधीत तंबाखू, गुटखा तसेच बनावट दारूची निर्मिती व अवैध विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे (रा. उबदा, ता. समुद्रपूर) याच्यासह तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली. दि. 7 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समुद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उबदा येथे छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान अनिकेत कांबळे याच्या घरी काम करणारा भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश मनोहर जिल्हारे तसेच समोरच्या घरात राहणारा राहुल डोफे हे आढळून आले. कायदेशीर झडतीमध्ये देशी व विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या, रॉयल स्टॅग कंपनीचे बनावट स्टिकर्स, रासायनिक द्रव्ये, सुगंधीत तंबाखू व गुटखा, बाटल्यांची झाकणे, सीलिंग व पॅकेजिंग मशीन असा मोठा साठा मिळून आला.
आरोपी बनावट पद्धतीने दारू तयार करून तसेच प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व गुटख्याची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून 13 खरड्यांच्या खोकीत 1,300 देशी दारूच्या बाटल्या, 65 विदेशी दारूच्या बाटल्या, विविध कंपनींचे गुटखा व तंबाखूचे पाकिटे तसेच बनावटीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 4 लाख 53 हजार 109 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा मानके कायदा, दारूबंदी कायदा व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crimenews /ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी मानवतकर, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, राहुल इटेकर तसेच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.








