प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा (दि. १६ आक्टोबर २०२५):
राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले ३१,६२८ कोटींचे शेतकरी पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने करत, वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॅकेजच्या शासन निर्णयाची “होळी” करत तीव्र आंदोलन छेडले.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अॅड. वामन चटप, माजी आमदार सरोज काशीकर, मधुसूदन हरणे, शैला देशपांडे, उल्हास कोंटबकर व सतीश दाणी आदींनी केले.
शासनाने जाहीर केलेल्या मदतीत मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी मदत कमी करण्यात आल्याचे सांगत, कोरडवाहू पिकांसाठी १३,६०० ऐवजी ८,५०० रुपये व बागायतीसाठी ३६,००० ऐवजी ३२,५०० रुपये दिले जात असल्याचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने आयात धोरण, निर्यातबंदी व वायदेबाजार बंदीमुळे शेतीमालाचे दर कोसळले असून, कडधान्य व कापसाच्या दरात मोठी घसरण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच, २०१८ मध्ये विहीर दुरुस्तीला मिळणारी १ लाख रुपयांची तरतूद या पॅकेजमध्ये फक्त ३०,००० रुपये करण्यात आली आहे, यावरही संताप व्यक्त झाला.
Devendrafadnsvis /शेतकरी संघटनेने हे पॅकेज शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे असून, “५०,००० रुपये हेक्टरी तातडीची मदत जाहीर करा” अशी स्पष्ट मागणी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत सादर करण्यात आली.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या समारोपात पिपरी पोहना, पानवाडी व सालोड हिरापूर येथील कार्यकर्त्यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.