Hingnghatnews /नगराध्यक्षपदासाठी पत्नी उमेदवार, पण कारभार पतीदेवांचा!

0
110

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:- हिंगणघाट नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असून, सर्वच पक्षांमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. मात्र यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने, या निवडणुकीचे रूप वेगळे झाले आहे.

पण, ज्या प्रकारे काही महिला उमेदवारांच्या नावांचा उल्लेख होत आहे, त्यावरून एक प्रश्न सरळपणे डोळ्यांसमोर उभा राहतो — उमेदवार पत्नी की कारभारी पती?
सामाजिक किंवा राजकीय क्षेत्राशी फारसा संबंध नसलेल्या, पक्षसंघटनेच्या कार्यात पाऊलही न ठेवलेल्या काही महिला आज उमेदवारीसाठी पुढे येत आहेत. मात्र, त्यामागे त्यांचे पतीच प्रमुख सूत्रधार असल्याचे उघड आहे.

पतींच्या राजकीय पुण्याईवर पत्नींना उमेदवारी मिळावी, अशी मागणी काही ठिकाणी उघडपणे होत आहे. ही परिस्थिती हिंगणघाटच्या राजकारणात चिंतनास पात्र आहे.

‘नाव तिचं, काम त्याचं’ ही प्रवृत्ती पुन्हा डोकावते आहे. आरक्षण महिलांसाठी असले तरी, प्रत्यक्षात सत्तेची लगाम पतींच्या हातातच राहणार हे चित्र जनतेलाही चांगले समजले आहे.

नगराध्यक्षपदाचे राजकारण हे जनसेवेसाठी असते, कौटुंबिक वारसदारीसाठी नव्हे, हे उमेदवार आणि पक्षश्रेष्ठींनी लक्षात ठेवावे.
या निवडणुकीत मतदारही अधिक सजग झाले आहेत. “पतीदेवांच्या छायेत असलेली नामधारी नगराध्यक्षा नव्हे, तर स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहिलेल्या महिला हव्याच,” असा सूर सामान्य जनतेत उमटताना दिसतो आहे.

Wardhanews /हिंगणघाटच्या राजकारणात या वेळचा निकाल केवळ नगराध्यक्ष ठरवणार नाही, तर ‘पतीछत्राखालील महिला राजकारणाला जनता नकार देते का?’ याचे उत्तरही देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here