प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : शहरातील राजकीय पारडं कोणत्या दिशेने झुकेल याकडे राज्याचे लक्ष लागले असताना, उद्या २ तारखेला नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत रंगली असून, वीसही प्रभागांत अत्यंत चुरशीची, बहुकोनी टक्कर पाहायला मिळत आहे.
नगरसेवक निवडणुकीत काही प्रभागात कमळ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमने-सामने उभे ठाकले आहेत, तर अन्य प्रभागांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) तसेच अपक्ष उमेदवार मैदानात असून मतदारांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.
या बहुकोनी लढतीमुळे हिंगणघाट शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे तसेच स्थानिक नेत्यांच्या राजकीय भवितव्याची परीक्षा होणार आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असून शहरात नेत्यांची धावपळ, कार्यकर्त्यांची गर्दी आणि मतदारांशी संपर्क मोहीम जोरात सुरू आहे.
Nagarparishadnews /राजकारणात या निवडणुकीनंतर मोठे फेरबदल दिसण्याची चिन्हे दिसत असून, उद्याच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदारांचा कौल कोणा पक्षाच्या पारड्यात वजन टाकतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.








