प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट (जि. वर्धा): नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर हिंगणघाट शहरात माँ राणीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. साई मंदिर, नंदोरी रोड परिसरात प्रतिष्ठापित करण्यात आलेली माँ राणीची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हिंगणघाटची माँ राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुर्गा देवीच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना २२ सप्टेंबर रोजी नवरात्रारंभाच्या दिवशी करण्यात आली. माँ राणी नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मूर्तीची सजावट, मंडपातील आकर्षक रोषणाई, आणि साई मंदिर परिसरातील वातावरण भक्तिभावाने भरलेले आहे. परिसरात लहान मुलांसाठी झुल्यांची व्यवस्था, तसेच खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांची खास मेजवानीही उपलब्ध आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, विधिवत पूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य गरबा महोत्सव हे खास आकर्षण ठरत आहे. शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने माँ राणीच्या दर्शनासाठी येत आहेत.
Navdurga/भाविकांनी अधिक संख्येने उपस्थित राहून नवरात्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले आहे.