महापुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबनेने गावात तणावाचे वातावरण परिस्थिती नियंत्रणात

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्मित झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोठे व महत्वाचे गाव मानल्या जाणार्‍या अट्रावल या गावात आज पहाटे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सुमारे दहा-बारा जणांच्या जमावाने पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास हा प्रकार केला. त्यांनी पहिल्यांदा येथील पथदिवा फोडून नंतर पुतळ्याची तोडफोड केली.

हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या जमावाने या ग्रामस्थांना मारहाण करत पलायन केले.

काही मिनिटांमध्येच ही वार्ता परिसरात पसरताच दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुफान हाणामारी झाली.

याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तथापि, अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याने लवकरच वातावरण नियंत्रणात आले.

वातावरण नियंत्रणात दिसून आले. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर आणि त्यांचे सहकारी अट्रावलमध्ये ठाण मांडून बसले असून दोन्ही गटांशी सुसंवाद साधत आहेत.

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून रॅपीड ऍक्शन फोर्ससह अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

पोलीस प्रशासनाने या संदर्भात येथे वातावरण नियंत्रणात असल्याचे सांगून कुणीही या प्रकरणाच्या बाबत अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे.

आज अट्रावलमध्ये जो प्रकार घडला, त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येत असून याबाबत कुणी सोशल मीडियात दिशाभूल करणारी माहिती प्रसारीत करू नये असेही पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Comment