गजानन सोनटक्के जळगाव जा
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना राज्यात राबविली जाते. याची मर्यादा आता 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येत असून बॅंकांनी या वाढीव मर्यादेप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच बॅंकांनी या अन्नदात्याच्या पाठीशी आधारस्तंभ बनून उभे राहावे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची 151वी बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत राज्याच्या 2021-22 साठीच्या 4 लाख 60 हजार 881 कोटी रुपयांच्या राज्याच्या पतआराखड्यास मंजुरी देण्यात आली.
या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठीचे उद्दिष्ट 1 लाख 18 हजार 720 कोटी रुपये असून यामध्ये पिक कर्जासाठीचे उद्दिष्ट 60 हजार 860 कोटी रुपयांचे आहे. लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांसाठी बॅंकांच्या वार्षिक पतआराखड्यात 2 लाख 49 हजार 139 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.