गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी चक्क अपघातात मयताचा मृतदेह आणला यावल पोलीस ठाण्यात
यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
अपघातात जखमी झालेला युवक मयत झाल्यानंतर त्याच्या आप्तांनी गुन्हा दाखल होण्यासाठी त्याचा मृतदेह थेट यावल पोलीस स्थानकात आणल्याने येथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, अरूण किशोर भालेराव आणि त्याचा मित्र विजय संजय इंगळे हे १० जानेवारी रोजी दुचाकीने कोरपावली येथून यावलला येत होते.
विरावली गावाजवळ त्यांना खलील रफीक तडवी ( रा. कोरपावली तालुका यावल) हा चालवत असलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले.
यातील अरूण किशोर भालेराव हा जबर जखमी झाल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्याने आज शेवटचा श्वास घेतला.
दरम्यान, या प्रकरणी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयत अरूण भालेराव याच्या आप्तांनी त्यांचे पार्थिव घेऊन थेट यावल पोलीस स्थानक गाठले. यामुळे पोलीस स्थानक परिसरात गोंधळ उडाला.
दरम्यान, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी मयताच्या आप्तांशी संवाद साधत या प्रकरणात आधीच नशिराबाद पोलीस स्थानकात नोंद झाली असून आता यापुढील गुन्हा हा यावल येथे दाखल करण्यात येईल असे सांगितले.
या अनुषंगाने संबंधीत ट्रॅक्टर चालक खलील रफीक तडवी ( रा. कोरपावली, ता. यावल) याच्या विरोधात भादंवि कलम ३०४ (अ); २७९; ३३७; ४२७, मोटार वाहन कायदा १८४, १३४ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामुुळे अखेर मृताच्या आप्तांनी पार्थिव घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेत.