रविकांत तुपकरांनी घेतली ऊर्जामंत्री ना.नितीन राऊतांची भेट.

 

महावितरणचे एम.डी असीम गुप्ता व मुख्य अभियंता पराग जांभूळकरांशी केली चर्चा..

मुंबई (20 नोव्हें.) – एकीकडे विजेचा व विज बिलांचा मुद्दा तापलेला असतांना, त्यातच जालना जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत..! रविकांत तुपकरांनी आज थेट मुंबई गाठत राज्याचे ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेवून या घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली. तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांच्या आशा आहेत. शेतात पाणी आहे पण वीज नाही, लोडशेडींग मुळे व विद्युत रोहित्र मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांच्या महावितरण विरोधातील तीव्र भावना तुपकरांनी ना.राऊत यांच्यासमोर मांडल्या.

यासोबतच तुपकरांनी ना.राऊत यांच्याकडे अतिशय परखड शब्दात काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये जालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे गावात शॉक लागून मृत्यू झालेल्या 3 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ भरीव मदत द्या, शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पूर्णवेळ विज द्या व लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करा तसेच बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात जळालेले विद्युत रोहित्र बदलून देण्यासाठी मुबलक ऑईल उपलब्ध करून देण्यात यावे यासर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास सरकारला शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा ही तुपकरांनी ऊर्जा मंत्र्यांना दिला.
रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता व महावितरण चे साहित्य व्यवस्थापनाचे राज्याचे मुख्य अभियंता श्री.पराग जांभूळकर यांचीही भेट घेवून विस्तृत चर्चा केली.
यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले उपस्थित होते.

Leave a Comment