वट वृक्षारोपण करून केले अस्थिविसर्जन .. नागरे कुटुंबाचे सर्व स्तरातून होता आहे कौतुक..

 

सिंदखेडराजा:- ( सचिन खंडारे )

भारतीय परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रेताच्या दहनानंतर ची रक्षा ही पवित्र धार्मिक स्थळे,पवित्र नदी, तलाव किंवा जलाशयात विसर्जित केल्या जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन विविध प्रकारच्या जलचरांचे जगणे कठीण होऊन जाते.पाण्याचे व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व जानत देऊळगावराजा नगरीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ नागरे यांच्या सुविद्य पत्नी तथा ख्यातनाम डॉक्टर संदीप नागरे,शिक्षक राजेश नागरे, व्यावसायिक जयदीप नागरे यांची आई स्वर्गीय दुर्गाबाई नागरे यांचे वयाच्या 64 व्या वर्षी अल्पशा आजाराने 14 एप्रिल रोजी निधन झाले होते.आज रक्षा विसर्जन पार पडले.परंपरेनुसार रक्षा ही नदी पात्रात विसर्जित न करता त्यांनी देऊळगावराजा शहर व परिसरात 63 वटवृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करत आज 3 वटवृक्षांचे रोपण केले.अस्थि विसर्जन नदीपात्रात किंवा इतर कोणत्याच प्रकारच्या जलाशयात न करता वृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्ड्यात रक्षा विसर्जित करून त्यात वृक्षारोपण केले व दहावे व तेरवी चा कार्यक्रम अगदी थोडक्यात कौटुंबिक स्वरूपात करून येत्या काळात आईच्या स्मृतीप्रित्यर्थ पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रावर सन्मानजनक निधी खर्च करण्याचा मनोदय श्री.नानाभाऊ नागरे,डॉक्टर संदिप नागरे तथा नागरे कुटुंबियांनी केला.
जल प्रदूषण टाळत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून धरती बचाओ परिवाराच्या माध्यमातून सातत्याने केल्या जाणाऱ्या आवाहनाला समाज चांगला प्रतिसाद देत असून अशा प्रकारचे कार्य ही परंपरा झाली पाहिजे असे विचार सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री.रमेशदादा कायंदे यांनी व्यक्त केले तर शिवसेना नेते डॉक्टर रामप्रसाद शेळके,ख्यातनाम डॉक्टर रामदास शिंदे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.देवानंद कायंदे,भाजपा चे जेष्ठ नेते डॉ.गणेश मांटे, देऊळगावराजा नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.संतोष खांडेभराड,सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रकाश गीते,माजी नगरसेवक श्री.गणेशराव बुरकुल,सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव जायभाये,महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे श्री.विजूभाऊ इंगळे,सिनगाव जहांगीर चे पोस्ट मास्टर श्री. गणेशराव डोईफोडे,ह.भ.प. रामराव महाराज डोईफोडे आदींनी वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांनी केलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ही चळवळ लोकचळवळ करण्यामध्ये आम्ही सर्व तन-मन -धनाने सोबत असल्याचे सांगितले.
नागरे कुटुंब तथा धरती बचाओ परिवार यांच्या संयुक्त सहभागातून समाजासमोर ठेवलेला आदर्श सर्व समाजासाठी दिशादर्शक ठरेल व यातूनच पर्यावरण संवर्धन चळवळ ही लोकचळवळ होईल असा आशावाद वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांनी व्यक्त केला.
मरावे परी वृक्ष रुपी उरावे या उक्तीला साजेसं कार्य केल्यामुळे आज सर्वदूर सर्व समाजात नागरे कुटुंबाच्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती.हे विशेष.

Leave a Comment