प्रतिनिधी :- सचिन वाघे
हिंगणघाट –
आज दिनांक २४ ऑक्टोबर रोजी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात एक हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. शेतकरी आपला कष्टाचा शेतमाल — सोयाबीनसह इतर धान्य — दोन पैसे मिळावेत या आशेने बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र, अवकाळी पावसाने या सर्वांची आशा अक्षरशः पाण्यात गेली.
पावसाच्या जोरदार सरींनी बाजार समितीच्या खुल्या आवारात ठेवलेला शेतमाल पूर्णपणे ओला झाला. शेतकऱ्यांनी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला माल वाचविण्याचा प्रयत्न केला, पण पावसाच्या धारांमध्ये त्यांचा कष्टाचा घाम आणि अश्रू दोन्ही वाहून गेले.
बाजार समितीकडून कोणतीही योग्य सुविधा किंवा तात्पुरती संरक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
नावाजलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे ही शासन आणि प्रशासन दोघांसाठीच चिंतेची बाब ठरत आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की, “आमचा माल ओला झाला, मेहनत वाया गेली – आता नुकसान भरपाई कोण देणार?”
Rainnews /सरकार आणि प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.








