इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव
relvenews:आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शेगाव रेल्वे स्थानकावर संविधान दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रभारी प्रबंधक डि.पी. मोहरीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. संविधान दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, आणि मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या महत्त्वाबाबत विचारमंथन केले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. आरपीएफ पोलीस स्टेशनचे पीएसआय डॉ. विजय साळवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)
त्यांनी भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडून सांगितली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी सर्वधर्म समभाव आणि सामाजिक समतेच्या तत्त्वावर संविधानाची रचना केली. त्यामुळेच दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
डॉ. साळवे पुढे म्हणाले की, संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. जात, धर्म, वंश, लिंग या कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबरच प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्ये पाळणेही महत्त्वाचे आहे.
या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाला शेगाव रेल्वे स्थानकाचे प्रभारी प्रबंधक डी.पी. मोहरीर, डीपीटीएसएम राजेश देशपांडे, आरपीएफचे एएसआय राजपूत आणि भटकर, मिताली देशमुख, मुख्य आरोग्य निरीक्षक कुणाल निकम, रेल्वे कर्मचारी भिका बनकर, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार व्यास, स्वच्छता विभागाचे श्रीराम उबाळे यांसह अनेक मान्यवर आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
relvenews:कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आरपीएफचे पीएसआय डॉ. विजय साळवे यांनी केले. संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे भारतीय संविधानाची महती आणि नागरिकांचे अधिकार व कर्तव्य याबाबत उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण झाली.