प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट, दि. २४ ऑक्टोबर २०२५
लाडकी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत एक ट्रॅक्टर, ट्रॉली व सुमारे १ ब्रास काळी रेती असा एकूण ८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुखबीरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, आरोपी प्रवीण प्रोफेश्वर मरापे (रा. पिंपळगाव) हा ट्रॅक्टर मालक योगेश देवराव सातपुते (रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट) यांच्या सांगण्यावरून लाल रंगाच्या महिंद्रा ट्रॅक्टर (क्र. MH 32 P 545) मधून लाडकी नदी घाटातून काळी रेती चोरी करून मौजा बुरकोणीकडे वाहतूक करीत होता.
ही माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत सदर ट्रॅक्टरला थांबवून तपासणी केली असता, रॉयल्टीविना रेतीची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळीच सविस्तर मौक्का पंचनामा करून रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, चेतन पिसे, उमेश लडके, राहुल साठे, सतीश घवघवे तसेच पोलीस नाईक रवींद्र घाटुर्ले यांनी केली.
सदर प्रकरणात हिंगणघाट पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








